कोण काय म्हणेल कशास चिंता करिशी कवयित्री
कवित्वाचा दागिना तुला लाभला झळाळणारा खरा
हृदयातुनी तुझ्या वाहे प्रेमाचा खळाळणारा झरा
काव्यातुनी उधळशी हिरे मोती नाही कुठे तू उणी
राहू केतू ग्रहांची तुला ना पीडा तुला न वक्री शनी
शिडीविना पोचतेस तारांगणी उडोनी पंखाविना
वेचशी तारे नभीचे गुंफावया गजरा सुईविना
समान तुला पुनव अमावस हिंडतेस ग्रहणी
रानात गुराख्यांसवे वाजविशी सांजेस तू बासरी
पाहुनी गवळणी देखण्या पेठी रचतसे लावणी
नका मांडू फुका कुंडल्या बिंडल्या तिच्या व्यर्थ कष्टुनी
मांडलेल्या कुंडल्यांची ठेविते ती दारी पायपुसणी
वाटे तिला लोपले ममत्व माया ओढे तळी आटुनी
कशाने बरे झरे तरी कळेना पापणीतळी पाणी
सुनीत (सॉनेट)