धुवांधार जलधार – DHUVANDHAR JALDHAR


In this poem the poetess describes how heavily rain fell and then what happened.

कोसळला तो वरुण नभातुन धुवांधार जलधार
धरणीला ना पेलवला हा धारांचा जोहार

थेंब तुझेरे मोतीमुक्ता नव्हते या वेळी
उगवून येण्याआधी गेल्या शेतातिल साळी
रडतील बागा रडतील शेते झरेल श्रावणधार

रूप तुझे हे पाहुन सरिता पिसाट ही झाली
कवेत घेउन गावे सारी धावत का सुटली
कुंतलासही चिखल फासला मुक्त तिचा संभार

काडी काडी जमवुन त्यांनी घरटी ही विणली
अमृतमय ही सलील जलदा गिळावया आली
उघडयावरती  पडले सारे मुके दीन संसार

वाटे मजला पंख पसरुनी द्यावी त्या छाया
दुबळे माझे मन हे आणिक दुबळी ही काया
षंढ मनातिल विचार हे कधि होतीलका साकार

सुजला सुफला या भूमीला विपदा का छळती
दूरदृष्टी  अन नसे नियोजन कसलेही वरती
युवक युवतीनो घडवा क्रांती उलथा भ्रष्टाचार

सोडून दे तू मूढ मानवा हाव तुझी आता
नको डावलू नियम सृष्टीचे उधळिल ती सत्ता
सृष्टीमधल्या चराचराला दे आता आधार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.