फिरतो घुमतो तो गंडोला
नको बावरू तू चंडोला
पाय रोवुनी पकड गजाला
करीत किलबिल बघत हिमाला
येता थांबा हळू उतर रे
पंख धवल तव उडत पसर रे
गाठ मंदिरा निळ्या अंबरी
स्वागत करतिल मरुत सुंदरी
पिंड शिवाची बर्फामधली
तुझ्याचसाठी सजली हसली
नाद अनाहत अनुभूतीचा
भरल्या हृदयी ऐक खऱ्याचा
ब्रम्ह दर्शना साठव नेत्री
परतून ये मग विदेह क्षेत्री