गृहिणी – कुटुंबाचा आधारस्तंभ – GRUHINEE-KUTUMBAACHAA AADHAARSTAMBH


This article describes how families in jain community play important role on national and international level.
Housewife in jain family  plays important role in building character of our own family and our nation also.
Jain families follow the basic principle i.e. purity of mind.

दक्षिण भारत जैन महिला परिषद ३ एप्रिल १८९९ साली स्थापन झाली. या संस्थेने यावर्षी ११३ वर्षे पूर्ण करून ११४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. आजच्या काळातल्या स्त्रीपेक्षा ११३ वर्षापूर्वीच्या काळातल्या जैन स्त्रियांचे किंवा इतर समाजातील स्त्रियांचेही राहणीमान, विचार करण्याची पद्धती, रीतिरिवाज हे सर्व आजच्या काळातल्या स्त्रियांपेक्षा निश्चितपणे वेगळे असले तरी तेव्हाच्या स्त्रीप्रमाणे आत्ताची स्त्रीसुद्धा जैन धर्मातील, अहिंसा व अनेकांतवाद(स्याद्वाद)  या मूलभूत तत्वांना आत्मियतेने जपणारी आहे; कारण कालचक्र कोणत्याही वेगाने फिरले तरी अहिंसा व अनेकांतवाद ही शाश्वत मूल्ये कोणत्याही काळाच्या कसोटीवर उतरणारीच नव्हे तर तळपणारीही आहेत.

शतकापूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी सुद्धा स्त्रीला पित्यावर, पतीवर किंवा पुत्रावर अवलंबून रहावे लागत असे. अर्थात या गोष्टीला त्याही काळात काही अपवाद होतेच; पण त्यामानाने  आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. स्त्रीशिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे आणि पाश्चिमात्य देशातील वैचारिक स्वातंत्र्याचे वारे मुक्तपणे अनुभवल्यामुळे काही विशिष्ट वर्गातील स्त्रियांचे राहणीमान, जीवनविषयक जाणिवा, बौद्धिक आणि आध्यात्मिक जाणिवा बऱ्याच प्रगल्भ आणि विकसित झाल्या. त्यांचा आत्मविश्वास वाढला. समाजातील त्यांचा आर्थिक स्तर, बौद्धिक स्तर निश्चितपणे उंचावला. त्यात निश्चितपणे काही जैन स्त्रियाही होत्या.

आमच्या जैन समाजातील स्त्रिया सद्य काळातही पुरुषांच्या बरोबरीने किंवा कधी कधी त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळवतात. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. पण तरीही कुठेतरी काहीतरी उणीव भासतेच. याला कारण म्हणजे भावनांच्या अभिव्यक्तीचे क्षेत्र म्हणजे उदा. ललित साहित्य, काव्य, गायन, वादन, नृत्य, नाट्याभिनय, शिल्पकला, चित्रकला  या क्षेत्रात आपण कोठेतरी कमी पडतो.

हे असे का घडते? याचे कारण म्हणजे आपल्या भावनांची अभिव्यक्ती नीटसपणे, सहजसुंदर पद्धतीने करण्यासाठी मूलभूत किंवा पायाभूत शिक्षण देण्यात आपली कुटुंब व्यवस्था कुठेतरी कमी पडायला लागली आहे. उशीरा का होईना पण बऱ्याचजणांना याची जाणीव व्हायला लागली आहे हे ही काही कमी नाही. स्त्रीला किंवा पुरुषालासुद्धा जगण्यात जिवंतपणा येण्यासाठी भावनांची नितांत गरज असते. त्यासाठी घरातले वातावरण निरोगी आणि मोकळेपणाचे असणे गरजेचे असते. ते वातावरण असे हसते खेळते आणि निरामय ठेवण्यात स्त्रीचा वाटा महत्वपूर्ण असतो. म्हणूनच मिळवत्या स्त्रीप्रमाणेच पूर्ण वेळ गृहिणी म्हणून घरासाठी, त्यातल्या प्रत्येक घटकासाठी आपला वेळ, आपली बुद्धी, आपलं कौशल्य, आपलं प्रेम पणाला लावणाऱ्या स्त्रीलाही सन्मान द्यायला हवा.

वेदपूर्व काळातील कला आणि विद्याविभूषित ब्राम्ही आणि सुंदरी, भ. महावीरांच्या काळातील श्रमणी चंदना, कर्नाटकातील राणी अबक्का या वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या काळात झळकलेल्या स्त्रियांचा वारसा आपण मोठेपणाने मिरवत असतो. पण त्यांचा फक्त वारसा मिरवल्याने आपण मोठे बनत नसतो. मला खूप काही करायचे आहे, माझ्यात खूप काही क्षमता आहेत पण त्यासाठी मला वेळच मिळत नाही किंवा माझी कौटुंबिक परिस्थिती माझ्या विकासात अडथळा आणते, अशा तऱ्हेचे नकारात्मक विचार स्त्रियांच्या आत्मविकासात बाधक ठरतात. असे विचार आपल्या मनातील इगो कुरवाळण्यासाठी ठीक असतात. पण त्यामुळे नुकसान आपलेच होते.

कुटुंबातल्या कर्त्या स्त्रीने कुटुंबाची जबाबदारी हे आपले प्रथम कर्तव्य समजून मगच आपल्याला झेपतील व आपल्याला आवडतील अशी काही छोटी मोठी  सामाजिक कार्ये जरूर करावीत.  पण स्वत:ची कुवत न ओळखता उगीचच खूप मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्यास नशिबी फरपटच येते. आपले सुसंस्कारित कुटुंब म्हणजे समाजाचा एक महत्वपूर्ण घटक आहे. अशी अनेक कुटुंबे मिळून सुसंस्कृत समाजाची निर्मिती होते. म्हणून कुटुंब घडवणाऱ्या स्त्रीने स्वत:ला अजिबात कमी समजू नये. आपणच आपल्याला कमी समजत राहिलो तर इतरांचेही चांगलेच फावते.

फावल्या वेळेत आपल्या घरात आपल्या पूर्वजांनी जैन आगमांचा जो अनमोल ठेवा जतन करून ठेवलेला आहे त्याचा स्वाध्याय,मनन, चिंतन आपण करायला हवे. जैन दर्शनाचे वेगळेपण जाणून आपल्या पौराणिक ग्रंथांमधील सीता, द्रौपदी या नायिकांना त्या ग्रंथाबाहेर काढून समाजापुढे उभे करायला हवे. रामाने प्रजारंजनासाठी अग्नीपरीक्षा द्यायला लावली म्हणून अग्नीपरीक्षा दिल्यावर आमची सीता भूमीच्या उदरात गडप झालेली नाही तर त्यानंतर तिने जीवन धर्ममार्गाने जगून कर्तव्यपूर्तीनंतर आर्यिकेची दीक्षा घेतली होती. आमची द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी कधीच नव्हती, ती तर फक्त अर्जुनाची पत्नी होती. आमच्या पद्म पुराणातील हनुमानाला शेपूट कधीच नव्हते. तो तर महापराक्रमी पवनंजय व सती अंजनेचा पराक्रमी व धर्मवत्सल पुत्र होता. या व अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी, वेगळ्या गोष्टी आपण आपल्या ललित ग्रंथातून, काव्यातून, नाट्यातून, संगीताच्या माध्यमातून इतर समाजातील लोकांनीही सहजपणे ग्राह्य धराव्यात अशा पद्धतीने समाजासमोर मांडायला हव्यात.

पुराणातल्या न पटणाऱ्या, अवैज्ञानिक आणि अहितकारक गोष्टींना प्रसंगोत्पात नवा कल्याणकारी अर्थ देऊन त्यानुसार वागण्याचे धाडस आपण दाखवायला हवे. समाजाला उपयुक्त ठरणारे, व्यक्तीमधल्या प्राकृतिक भावना उमलवणारे लेखन केल्याने आपल्याला कर्मबंध होत नसून त्यात अधिक काळ गुंतून राहिल्याने कर्मबंध होत असतो. म्हणून अशा तऱ्हेच्या कला जोपासण्यासाठी जैन महिला परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील व्हावे.

(स्मृतिगंध(शतकोत्तर तपपूर्ती निमित्त दक्षिण भारत जैन सभा- जैन महिला परिषद, सांगली यांनी प्रकाशित केलेली स्मरणिका) वरून साभार.)

,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.