In this story a touching and true friendship between a small girl and boy is described.
गोटी आणि टिल्लूचे घर अगदी शेजारी शेजारी होते. आपल्या लाल रंगाच्या तिचाकीवरून टिल्लू अगदी वेगात आला. खिडकीत उभ्या असलेल्या गोटीला पाहून म्हणाला, “गोटे, चल खेळायला.” मी नाही येणार. कट्टी आहेना आपली ? विसरलास वाटतं?” गोटी म्हणाली. टिल्लू मग निघून गेला.
“गेला तर गेला! मला काय त्याचं?” गोटीने गाल टम्म फुगवले. तेवढ्यात टिल्लूची आई कॉलेजातून घरी आली. ती म्हणाली “चला गोटूबाई! येताका घरी वाघोबाची गोष्टऐकायला?” गोष्ट म्हणताच गोटी बारा महिन्यांची कट्टी विसरली आणि टिल्लूच्या घरात घुसली. टिल्लूच्या आईने तिला आणि टिल्लूला जंगलातल्या वाघोबाची गोष्ट सांगितली. गोटीला ती खूप खूप आवडली, पण.. अधूनमधून टिल्लू घशातून खर्रर्र खर्रर्र आवाज काढत होता- वाघासारखा! असे फक्त त्यालाच वाटले!
गोष्ट संपल्यावर दोघेही बाहेर आले. विहिरीजवळच्या खड्डयात पावसाचे पाणी तुडुंब भरले होते. दोघांनी मिळून कागदाच्या खूप छान बोटी बनवल्या.
खड्डयातल्या पाण्यात त्या डौलात तरंगू लागल्या. गोटीला वाटलं तो खड्डा म्हणजे मोठा समुद्र आहे. त्यातून आपल्या बोटी निघाल्या आहेत सफरीवर! कोठे जातील त्या? सातासमुद्रा च्या पार? काय असेल तिथे? रत्नांच्या खाणी कि पाचूचे डोंगर?
तेवढयात टिल्लूने एक मोठा दगड नेम धरून बोटीला मारला. बोट हळू हळू पाण्यात बुडायला लागली. गोटीला वाटलं आता ती बोट खोल खोल जाणार. अगदी समुद्राच्या तळाशी! काय असेल तिथे! जलपरीचा महाल की मासोळ्यांची घरे?
“ए गोटे काय बघतेस?” टिल्लू तिच्या कानात जोरात ओरडला आणि म्हणाला, “सगळ्या बोटींना दगड मारून पाण्यात बुडवलं मी! चल आता, घरी जाऊयात.” ती म्हणाली, “कारे टिल्लू बोटी का बुडवल्यास? ” “अग त्या फिरंग्यांच्या होत्याना म्हणून बुडवलं मी त्यांना.” टिल्लू उड्या मारत म्हणाला.
“नाहीरे टिल्लू त्या बोटी फिरंग्यांच्या नव्हत्याच मुळी! त्या तर सिंदबादच्या होत्या.” गोटी स्वत:शीच पुटपुटली आणि टिल्लूच्या पाठोपाठ त्याच्या घरी गेली.
“गोटी चल, आपण शाळा शाळा खेळायचं का? टिल्लूने विचारलं.
हो ss खेळुयातकी, पण मी बाई होणार. मी तुला कविता शिकवणार.”
“हट! मी नाही तुझ्याकडून कविता शिकणार. मीच गुरुजी होणार आणि मीच तुला पाढे शिकवणार.”
“आहारे, म्हणे मला पाढे शिकवणार. स्वत:ला तरी येतात का पाढे? म्हण बघू एकोणीसाचा पाढा.”
हे ऐकताच टिल्लूच डोकंच भडकल. दोघांची मग चांगलीच जुंपली. गोटी भोकाड पसरायच्या बेतातच होती, पण तेवढयात टिल्लूची आई धावतच आली.
“सारखं रे कसलं भांडता? ही घ्या किल्लीची आगगाडी आणि आता परत भांडू नका बरं.” असं म्हणून टिल्लूच्या आईने त्यांना आगगाडी दिली आणि ती झोपायला गेली.
मग टिल्लू म्हणाला “यात बसून आपण खोट खोट मुंबईला जायचं का? माझ्या मावशीकडे?”
“आधी आपण मुंबईलाच जाऊयात, पण त्याच्यानंतर आपण माझ्या काकाच्या गावाला पण जायचं?”
“कुठलं गाव तुझ्या काकाचं?”
“कुडची” गोटीने ठसक्यात उत्तर दिले.
“कुडची?” हे कसलं घाणेरड गाव?
“ए टिल्ल्या तुझंच गाव असेल हं घाणेरड. माझ्या काकाची बैलगाडी आहे म्हटलं पांढऱ्या पांढऱ्या बैलांची. ती आम्हाला न्यायला येते स्टेशनवर.”
“बैलगाडी? गोटे, मला नेशील तुझ्या काकाच्या गावाला? मलापण बैलगाडीत बसायचंय.”
“नेईन की. अरे माझ्या मामाची पण बैलगाडी आहे. माझ्या मामाच्या गावाला ओढा पण आहे. तिथे मोर पण असतात. ते पिसारा फुलवून नाचतात.” गोटीने तर नाचायलाच सुरुवात केली.
“फक्त मोरच असतात का तिथे? वाघ नसतात? राणीच्या बागेत तर वाघ पण असतात.” असे म्हणून टिल्लूने परत घशातून खर्रर्र खर्रर्र आवाज काढायला सुरुवात केली.
तेव्हा गोटी चिडून म्हणाली, “टिल्लू बंद कर तुझा तो घाणेरडा वाघाचा आवाज.”
“हट! मी नाही बंद करणार. तुझा तो नाचणारा मोर मला नाही आवडत. मला वाघ आवडतो वाघ.” असं म्हणून टिल्लू दोन्ही हात पसरून तिच्यावर चाल करून गेला.
मग गोटीनेही त्याला दोन्ही हातांनी जोरात ढकलून दिले. तेव्हा मात्र वाघोबांची स्वारी आणखीनच खवळली. वाघोबाचा पवित्रा सोडून त्याने गोटीचे केस ओढायला सुरुवात केली. मग गोटीही संतापली. दोन्ही हात कमरेवर ठेऊन म्हणाली, “टिल्ल्या आता बारा महिने कट्टी म्हणजे कट्टी. तुझ्या आईने सांगितलं तरी.” गोटी तरातरा चालत घरी आली.
त्यानंतर सातआठ दिवसांनी शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली. गोटी, तिचे आईबाबा, ताई आणि दादा सर्वजणच गावाला निघाले होते. दारात अब्दुलचा टांगा येऊन उभा राहिला. गोटीच्या आईबाबांची निघायची धांदल सुरु होती. गोटी मात्र केव्हाचीच तयार होती. धावत जाऊन ती टांग्यात बसली. खिडकीतून टिल्लू तिच्याचकडे पहात होता. त्याने हाक मारली, “गोटी! गोटी!” गोटीने तोऱ्यात मान फिरवली. तेव्हा टिल्लू बाहेर आला. टांग्याजवळ येऊन हळू आवाजात
म्हणाला, “गोटी तू परत केव्हा येणार?”
“मी परत नाहीच येणार. मी चालले गावाला, तू जा आता.”
“गोटी तू आपली जादूची पोतडी कुठे ठेवलीयेस?”
जादूची पोतडी म्हणताच गोटीने टांग्यातून दाणकन उडी मारली. सात-आठ दिवसांचा अबोला ती क्षणात विसरली. टिल्लूचा हात पकडून तिने त्याला अंगणातल्या कडूनिंबाच्या पाराजवळ नेले. पारावरची एक फरशी उखडली होती. त्या फरशीखाली गोटीने लाल रंगाची पोतडी ठेवली होती. मग टिल्लूला हायसे वाटले. तो कमालीच्या गोड आवाजात म्हणाला, “गोटी तू तुझ्या मामाच्या गावाहून मोराची पिसं आण. ती आपण पोतडीत ठेवूयात.”
मी आणणारच आहे मोराची पिसं, पण तू आपल्या पोतडीवर लक्ष ठेवशील? नाहीतर वस्तीवरचा शिवा आपली पोतडी चोरून नेईल ना!”
तेवढ्यात गोटीच्या बाबांची हाक आली. ती धावत जाऊन टांग्यात बसली. दोघांनी हात हलवून एकमेकांचा निरोप घेतला. पाहता पाहता सुट्टी संपत आली.गोटी गावाहून परत आली. यावेळी गोटीची आजीपण बरोबर आली होती. टांगा दारात येऊन थांबताच पुढे बसलेल्या गोटीने खाली उडी मारली. ती घराकडे धावली.
पण ..तिचे बाबा तर टिल्लूच्या घराच्या खिडकीत उभे होते. टिल्लूकडे काम करणारा नाना शिपाई लगबगीने बाहेर आला. त्याने टांग्यातल सामान खाली उतरवलं. सर्वजण घरात गेले. पण गोटी मात्र अंगणातच उभी होती. तिने विचारले, “नाना तुम्ही आमचं सामान टिल्लूच्या घरात का नेताय?”
“हे घर आता तुमच झालं. टिल्लूच्या बाबांची बदली झालीना तिकडे कर्नाटकात!” नानामामाच्या या उत्तरावर गोटीला काहीच सुचेना. ती यांत्रिकपणे आत गेली. घरभर हिंडली.
दुसऱ्या दिवशी तिची शाळा सुरु झाली. आज तिला कोणाशीच बोलावसं वाटत नव्हतं. शाळा सुटताच ती घरी आली. पारावरची उखडलेली फरशी तिने बाजूला केली. लाल पोतडी तिने बाहेर काढली. मध्यंतरी झालेल्या पावसाने ती थोडीशी ओलसर झाली होती. ती पोतडी तिने पारावरच्या फरशीवर रिकामी केली. बांगड्यांचे रंगीबेरंगी तुकडे, शंख-शिंपले, गारगोट्या, वाघाची, हत्तीची चित्रं आणखी बरंच काही! त्रिलोकातली सारी दौलत जणू गोटीच्या पुढ्यात पसरली होती.
हळुवार हातांनी गोटी तो ढिगारा वरखाली करत होती. तिला खूप खूप रडावसं वाटत होतं. मोठ्यानं रडावं वाटत होतं. पण रडू घशातून बाहेरच येत नव्हत.
जप संपवून गोटीची आजी गोटीजवळ येऊन उभी होती. पण गोटीचे तिकडे लक्षच नव्हते. आजीने गोटीला जवळ घेतले. तेव्हा गोटी म्हणाली,
“आजी टिल्लू आता इथे राहायला कधीच नाहीका येणार? ”
“नाहीग गोटू! तो आता इकडे कशाला येईल?”
“मग मी आता कोणाशी खेळू? मला टिल्लूची खूप आठवण येतेगं.”
बोलता बोलता गोटीच्या डोळ्यातून पाणी आले. मग तिला आणखीनच जवळ घेत आजी म्हणाली, “गोटे तू दोशी काकूंच्या चंदन बरोबर खेळ, नाहीतर वस्तीवरचा शिवा आहे, बारकू आहे. त्यांच्याबरोबर खेळ… आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आठवणी मग त्या दु:खाच्या असोत किंवा आनंदाच्या,त्या सारख्या उकरून नाही काढायच्या.त्यांना जपायचं पण कुरवाळत नाही बसायचं; नाहीतर मग त्या आठवणींची भुतं होतात आणि नाचायलाही लागतात.” आजीच बोलण ऐकून गोटीच्या निरागस चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह उमटलं. मग आजी म्हणाली, “आठवणींना खोल खोल पुरायचं, त्यावर हलक्या हातांनी माती पसरायची. पाणी शिंपायच! मग केव्हातरी त्या आठवणींच झाड वर येतं. त्याला पानं-फुलं येतात. ती आपल्याला आनंद देतात. सुगंधित करतात.” आजीचा शब्द न शब्द गोटी मन लाऊन ऐकत होती.
दुसऱ्या दिवशी ती नेहमीपेक्षा लवकर उठली. ती बागेत आली. झेंडूच्या वाफ्यांसाठी पसरलेल्या मातीत तिने मधोमध एक छोटासा खड्डा खणला. त्या लाल पोतडीतली सारी दौलत तिने त्या खड्डयात रिकामी केली. आठवणींचा खजिना रिता करून तिने वाफ्यातली माती परत एकसारखी केली.
नेहमीप्रमाणे मग ती शाळेत गेली. बाईंनी दिलेला अभ्यास केला. मैत्रिणींबरोबर खूप खेळली. संध्याकाळी ती घरी आली तेव्हा झेन्डूसाठी बनवलेल्या वाफ्यात नानामामानी वाळलेल्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या पसरल्या होत्या. गोटीने त्यावर माती पसरायला त्यांना मदत केली. पाईपच्या तोंडावर बोट ठेवून त्यावर पाणीही शिंपडले.
पाहता पाहता दिवस सरले. टिल्लूची आठवणही हळू हळू धूसर धूसर होत गेली. गोटीची आजीही परत गावी गेली. दसरा जवळ आला. गोटीने पाटीपूजनासाठी नवी कोरी पाटी आणली. जुनी पाटीही कोळशाने घासून लख्ख केली.
झेंडूची रोपं बघता बघता तरारून वर आली. त्यावर कळ्याही आल्या. मग एका ओल्याचिंब सकाळी गोटीने पाहिलं, झेंडूच्या रोपांवर चेंडूसारखी गोल गोल फुलं डोलत होती. गोटीच्या मनात आनंद मावेनासा झाला. तिला वाटलं, झेंडूचा वाफा म्हणजे एक जंगल आहे, आणि त्या जंगलात पिवळे पिवळे गोल गोल वाघोबा बसले आहेत.
खर्रर्र ..खर्रर्र, गोटीच्या गळ्यातून नकळत आवाज आला. तिला खूप खूप हसायला आलं. ती मनात म्हणाली, “आजी म्हणते तशी आठवणींची झाडे होतात तर!
मग तिने परत घशातून खर्रर्र खर्रर्र असं आवाज काढला. ती हसायला लागली. हसून हसून बेजार झाली. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागले, तिने पाहिले तर समोरच्या वाफ्यांमधले वाघोबासुद्धा हसत होते. हसता हसता वाऱ्यावर डोलत होते. अगदी टिल्लूसारखेच.