घाबरू कशाला काळास म्हणते लेखणी कापे कडे
राहुनी काळासवे लंबकापरी आंदोले मागे पुढे
पाहता ती मान वेळावुनी मागे थबकतो काळही
मुग्ध होतो पाहून कृष्ण तिचिया अधरी ग बासरी
लेखणीच शिकवते नवी भाषा खुल्या वर्तमानाला
आणते भानावरी भूतकाळास फोडते भविष्याला
आजमावे शक्ती अणुकणांतील ना राहते गाफील
चौफेर फिरे दाही दिशात पण हातात नाही ढाल
घुसमटता ऊर मोकळा व्हाया लेखणी लढे भांडे
स्वातंत्र्य मिळविण्या अभिव्यक्तीचे लेखणी रक्त सांडे
जाहली बंबाळ तरीही उभीही टोकावरी लेखणी
धावते पडते जगते कवीच्या श्वासावरी लेखणी
काळांशी तीनही मैत्री आवडते लेखणीस करणे
रसिका तू हृदयामधुनी ऐक तिचे गुणगुणणे
सुनीत (सॉनेट)
वृत्त – शार्दूलविक्रीडित