आपण जेंव्हा जन्मतो तेंव्हा आपल्या आत एका परिपूर्ण सर्वांगसुंदर आत्म्याची प्रतिमा असते. त्या प्रतिमेनुसारच आपण घडत वाढत जातो. हि प्रतिमाच आपली सच्ची जन्मकुंडली असते.
आपली कुंडली आपण स्वतःच मांडू शकतो. जाणू शकतो. आपल्याला हवी तशी बदलूही शकतो. त्यासाठी इच्छाशक्ती बुलंद असावी लागते.हाच तर आपला प्राण असतो. दुसरा कोणीही आपली सच्ची जन्मकुंडली जाणू शकत नाही. लिहू शकत नाही. बदलू शकत नाही.
आपल्या अर्भकावस्थेत आपल्या सभोवतालची परिस्थिती आपल्या पूर्वभवातील कर्मानुसार मिळालेली असते. शिशुवयात बालपणात याची जाण असूनही आपण आपल्या पूर्वकर्मांशी बद्ध असतो.
पण वाढत्या वयानुसार, स्वतःच्या बुद्धीनुसार शक्तीनुसार आपलीजाण वाढत जाते. हळूहळू वय जसजसे वाढत जाते तसतसे आपले भवताल,भवतालातली जीव, जीव सृष्टी,आजूबाजूची माणसे, आपल्याला भावणारे भवताल, जगातली विषमता, व्यक्तीमधील चांगुलपणा सच्चेपणा यातून जे ज्ञान ग्रहण केले जाते त्यातून स्वतःची जाण वाढत जाते.
ही जाण ..हे ज्ञान जसजसे विकसित होत जाते तसतसा आपला स्वतःवरचा विश्वास वाढत जातो. त्यानुसार ज्या घडीपासून आपण स्वतःवर ठाम विश्वास ठेऊन कृती करू लागतो यालाच सम्यग्दर्शन सम्यक श्रद्धा असे म्हणतात.या श्रद्धेमुळे जे ज्ञान ग्रहण होत जाते तेही सम्यकच असते. मगच आपली प्रत्येक क्रिया आपले आत्महित करणारी असते..अशी सम्यकश्रद्धा जागृत होणे हेच तर मानवीजन्माचे सार्थक असते.
स्वतःवर अशी ठाम श्रद्धा असणारी व्यक्ती इतरांना आपली मनस्थिती बिघडवू देत नाही. आपले भवताल आपल्या नियंत्रणात ठेवते. हेच तर जादुई रत्नत्रय असते.