कुंकुमवर्णी गडद गुलाबासम सुंदर कांती
जर्बेरा अन शेवंतीची कुंतलात फांती
पद्म पाकळ्यांवर भृंगांसम नेत्री तेजप्रभा
आम्रफलासम मुखकमलावर नाकाची शोभा
भृकुटी दोन्ही तोल साधण्या वळणदार वेली
ओठ टपोरे बदाम लालस गालांवर चेरी
पिंपळपाने दोन कर्ण अन कुंडल जास्वंदी
बकुळ फुलांची नाजूक रेखिव भाळावर बिंदी
घटपर्णी डौल गळ्याचा सर प्राजक्ताचा
पदर उन्हाचा हळदी रंगी स्पर्शे सहज नभा
सुडौल बाहू जणु केळीचे घाटदार बुंधे
पर्ण-केवडे त्यावर वाक्या बाजुबंद बंदे
कमर-मेखला कलशाभवती पाने आंब्याची
सुडौल श्रीफळ उदार शोभते बांधेसुद भारी
जललहरींचा चमचमणारा पायघोळ शालू
पुनव शरदिनी उभी गावया जिनवाणी ‘बोलू’