चल ये लिहूत गझला …… ……
दोघे मिळून आता
ही पायवाट ओली ———–
भिजवू दवात आता …
वाटेवरी दुतर्फा
टाकू बिया फळांच्या
जपतील पादचारी
अंकूर नवतरूंचा …
वाढून उंच झाडे
झुलतील वारियाने
फांदीवरी बसोनी
गाऊत प्रेमगाणे …
येतील पाखरे मग
बांधावयास घरटी
किलबिल ऐकुनीया
रचतील कोण गोष्टी …
छायेत गर्द झोपे
पान्थस्त सावलीला
होताच सांज सुंदर
भेटेल तो सखीला …
रात्रीस चंद्रकिरणे
झरतील अंगणात
बाजूस मायबाप
झोपेल बाळ शांत …