In this poem the poetess says, today my mind became very very soft, fragnant and cool.
आज किती मी कोमल बनले
शीतल आणिक सुरभित बनले
दवात भिजवुनी शुष्क पाकळ्या
सुगंधीत मी फूल बनविले
शुभ्र गुणांचे बीज पेरले
मातीमध्ये अर्थ मिसळले
भावजलाने त्यास शिंपले
तरू प्रीतिचे वरती आले
पर्ण फुलांनी बहरून गेले
मांडव घालुन जाळीदार मी
स्वतःच त्याचे छप्पर बनले
पहाटवारा लहरत आला
तलम धुक्याची फळी घेउनी
मृदु कुसुमांचा सडा शिंपला
वेचुन सुमने रविकिरणांनी
परडी भरली बघ पुष्पांनी
भरली आहे माझी ओंजळ
मम प्रीतीसम हसते नीतळ
बिंब पहाया येतिल सारे
अंबरातले खग अन तारे
वाहून ओंजळ झाडापाशी
अश्रूफुलांच्या ओतून राशी
करेन मैत्री मी सर्वांशी