थोडी नाही थोडी नाही – THODEE NAAHEE THODEE NAAHEE


थोडी नाही थोडी नाही
होना खूप वेडी
स्वतःमधल्या शहाणीला
करना पुरती वेडी
म्हण तिला लाडे लाडे
शाणुबाई उठा
इग्गो बिग्गो अग्गो असला
सोडा खुळचटपणा
आवाजात भसाड्या
गाणे गुणगुणा
ठोकून द्या थाप म्हणा
हाच राग तोडी…
थोडी नाही थोडी नाही
होना खूप वेडी
स्वतःमधल्या शहाणीला
करना पुरती वेडी
शेजारणीशी जोरजोरात
करा गप्पाटप्पा
उघडून टाका मनाचा
कुलूपबंद कप्पा
अंगण झाडा खराट्याने
उचला राडारोडी
थोडी नाही थोडी नाही
होना खूप वेडी
स्वतःमधल्या शहाणीला
करना पुरती वेडी
म्याचींग फिचींग इस्त्री बिस्त्री
नक्को वेणीफणी
केस पकडा हाताने
बांधा एक पोनी
खोखो खोखो हसा काढून
स्वतःचीच खोडी …
थोडी नाही थोडी नाही
होना खूप वेडी
स्वतःमधल्या शहाणीला
करना पुरती वेडी
झऱ्याकाठी जाऊन फिरा
पाण्यामध्ये नाचा
सूर्यास्ताचे रंग बघा
उंचावून टाचा
सैर कराया पाण्यामध्ये
सोडा आता होडी
थोडी नाही थोडी नाही
होना खूप वेडी
स्वतःमधल्या शहाणीला
करना पुरती वेडी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.