आषाढी धोंडा अधिकच मोठा वाटे
शोधून स्वतःतिल उणे टोचण्या काटे
पाडली जयांनी भिंत मनूची दगडी
ते फेकुन देतीअंधरुढींची पगडी
ही पहा रुबाई माझीही गाताना
मात्रांची बाविस म्हणते मजला गाना
मी गाता गाता लिहिते अन हसतेही
जे निसटाया आतुर त्यांना धरतेही
हा कोकिळ ताना अवेळीच का घेई
गाण्यातिल अमृत कुणाकुणाला देई
मज नकोच अमृत हवे घनातिल पाणी
भरावयाला सत्त्वर अगणित खाणी
हाकून कुणाला द्यावे आता सांगा
दर्शना पातल्या भक्त-जनांच्या रांगा
मंदिरी मशीदी एकच ईश्वर आहे
कळते त्याला जो उघडुन हृदया पाहे
पाचवी रुबाई मोहक माझी फुलली
जणु वेलीवरती कळी जुईची झुलली
या कळीस जपण्यासाठी माझे गाणे
रुसते खुलते मम चंचल चित्त दिवाणे