खाणदेश अन विदर्भ कोकण मावळ घाट नि मराठवाडा
सह्याद्री अन सातपुड्यावर मजेत उडती बलाक माला
जिवंत आहे शिल्प अजंठा अन वेरूळची कोरीव लेणी
रायगडावर अजून घुमते शिवरायांची अमोघ वाणी
धर्मवीरांची शांत गुरुकुले कर्मवीरांची धर्म साधना
स्वर्ग कराया या भूमीचा अज्ञानाशी युद्ध सामना
पुत्र येथला ऐसा गुंडा घटना लिहितो या देशाची
किमया करिती इथे महात्मे स्त्रीशक्तीला फुलवायाची
वारणेतले वाघही इथले झांशीवाली राणी इथली
पवना भीमा मुळा मुठेने सुजला सुफला भूमी सजली
गझल भजन वा असो पवाडा असो लावणी अथवा भारुड
असो कानडा गुजरी इथला कवी कुळाचे त्यांवर गारुड
काटक कणखर मरगठ्ठ्यांनी इंच इंच ही धरा रक्षिली
राष्ट्र महा हे त्रिवार सांगुन शब्दांजली मी त्यांस अर्पिली