In this poem the poetess describes pleasant atmosphere and state of our mind in various seasons.
आत्ममग्न शिशिराला
जागविते ध्यानातून
वसंताची प्रीत गाते
कोकिळेच्या कंठातून
केतकीच्या गर्भापरी
हेमंत हा सोनसळी
ग्रीष्म सखी तापवूनी
बुडविते सांज जळी
मेघदूत आषाढाचे
नभातील खगांपरी
उत्तरीय काळेनिळे
उडे बघ वाऱ्यावरी
धारा झरे झरझर
बागडते जलपरी
वीज तेज कडाडते
आकाशाच्या पटावरी
श्रावणाच्या रंगसरी
भिजवुनी जाती दूर
भादव्याची पीत पिसे
पसरली रानभर
मेघमाला माहेराला
निघाली ग वाऱ्यासंगे
जोंधळ्याचे द्वाड बाळ
हुंदडते पानांसंगे
चंद्रकळा निशा नेसे
निळेभोर तिचे भाल
तारका या नाचताती
अंतरंगी सूरताल
चंदनी या वीणेतून
शारदीय सप्तसूर
प्रशांत या पाण्यावरी
झरे चांदण्यांचे क्षीर