श्रावणा रे शिंप झारी
पंचमीला आल्या पोरी
देऊळात राऊळात
मंदिरात रागदारी
सोनसळी ऊन झरे
कौलारू या घरांवरी
कंकणे तू भर बयो
कासारीण आली घरी
अंगणात गुलबक्षी
दवबिंदू जुईवरी
पाखरांचा दंगा चाले
जास्वंदीच्या फांदीवरी
रंगभोर इंद्रधनू
आभाळाच्या भाळावरी
नाचू गावू फेर धरू
फुललेल्या भुईवरी