इलाहींच्या स्त्री-मुखी गझला :
स्त्री मनाच्या लाजऱ्या-बुजऱ्या प्रणय भावना, साध्या साध्या गोष्टींसाठी तिला इतरांशी आणि स्वतःशीही करावा लागणारा संघर्ष, तिच्या विचारांवर इतरांनी घातलेली कुंपणे, तिच्या व्यथा, वेदना, तिचा सोशिकपणा यांचा वेध घ्यायचा असेल तर तिच्या अंतःकरणात फक्त डोकावून पाहण्याने भागत नाही तर तिच्या अंतःकरणाचा प्रत्यक्ष ताबाच घ्यावा लागतो.
स्त्रीत्व व पुरुषत्व या बाबी पूर्णतः वेगवेगळ्या असतच नाहीत. जीवविज्ञान किंवा मनोविज्ञान हेच सांगते. इलाहींच्या स्त्रीमुखी गझला म्हणजे त्यांचा स्त्रीमनाला अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न असेल किंवा तिच्या संवेदना जशा न तशा आत्मसात करून त्या व्यक्त करण्याचा एक समंजस प्रयत्न असेल.
कविवर्य भा.रा. तांबे यांनी अशा स्त्रीमुखी काव्यातून स्त्रीच्या मनाला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी काव्यलेखनात त्यांना लिंगांतराची गरज भासली आहे.
कवी इलाहींनी अशा स्त्रीमुखी गझला लिहून स्त्रीला गझल नायिका होण्याचा मान किंवा हक्क पुरुषांइतकाच बरोबरीचा आहे हे दाखवून दिले आहे.
या दृष्टीने पाहिल्यास ज्येष्ठ समीक्षक डॉ. रा. ग. जाधव यांनी अनुराधा साळवेकर यांच्या विराणी या पुरुषमुखी कवितेवर केलेले भाष्य गझलकारांनी किंवा गझलसमीक्षकांनीही वाचायलाच हवे ते पुढीलप्रमाणे आहे.
“विराणी गझल रचना पुरुषमुखानेच व्हावी असा संकेत आहे काय? आणि तसा तो असेल तर कवयित्रींनी तो पाळलाच पाहिजे काय? प्रेषितपणाची तथाकथित गझल वृत्ती स्त्रीला अप्राप्य ठरते काय? खरे तर रूढ मराठी गझल रचनेची जी लोकप्रिय व कविप्रिय आशयसूत्रे आहेत ती अधिक सखोल अधिक उत्तुंग अधिक प्रत्ययकारी स्वरूपात स्त्रीला सहज प्राप्त आहेत.”
माणूस नावाचे फटिंग बेट असण्याची, जगातले सगळे अन्याय आपल्याच नशिबी आल्याची, आदि काळापासून आपले अस्तित्व विस्तारण्याची व ते अनंत कालपर्यंत भिडल्याची ग्वाही देण्याची, हौतात्म्याची वेणा प्रसवण्याची आणि नेमक्या बेधडक शाब्दिक हुकमतीची कलंदर संवेदनशीलता ही जर गझल रचनेची अट असेल तर ती अट पूर्ण करण्याचा वास्तव नैतिक हक्क व क्षमता स्त्रीमध्येच आहे.
आजपर्यंतच्या जगातील सर्वात जास्त अपराधित व्यक्ती, सर्वात जास्त उपेक्षित प्रेषित, सर्वात जास्त दलित म्हणजे गझल नायक असेल तर या निकषांवर खरेतर गझल नायिका होण्याचा स्त्रीचा हक्क पुरुषांपेक्षा अधिक मोठा ठरतो.
“मी छेडितो कधीची मौनातुनी विराणी ओठावरी कशाला हृदयातली कहाणी ?”
अशी आपल्या गझलेची सुरुवात करण्याऐवजी अनुराधा साळवेकरांनी ती “मी छेडिते कधीची ” अशी स्त्रीलिंगी केली असती तर कुणाचे काय बिघडले असते? गझलांसाठी पुरुषी कलंदरपणाचा बहाणा स्त्रीने का करावा? त्यासाठी लिंगांतराची खरोखर गरज आहे काय? कवयित्रींच्या काव्यातील लिंगांतराची भूमिका याही अर्थाने अभ्यासनीय ठरते. विशेषतः गझल रचनेसाठी अशी भूमिका घेणे काहीसे फॅशनेबल वाटते.( वाङ्मयीन प्रवृत्ती तत्व शोध पृष्ठ क्र . १९/२०)
या सर्व विवेचनावरून असे म्हणावेसे वाटतेकी, गझलांसाठी पुरुषी कलंदरपणाचा बहाणा स्त्रीने करण्याची गरज नसली तरी शेवटी पुरुषांनी लिहिलेल्या स्त्रीमुखी गझला किंवा स्त्रियांनी लिहिलेल्या पुरुषमुखी गझला ह्या वादाचा विषय ठरू नयेत. पण त्या एकमेकांच्या काव्यात्म समरसतेचा विषय ठराव्यात.
जखमा अशा सुगंधी, अर्घ्य, भावनांची वादळे,ओऍसिस या संग्रहांत इलाहींनी स्त्रीमुखी गझला लिहल्या आहेत.त्यांची नावे पुढीप्रमाणे:-
१) करू नये ते केले होते अवखळ वाऱ्याने (भावनांची वादळे पृ.६)
२)वावर त्याचा हृदयाच्या आसपास बाई (भावनांची वादळे(पृ. ५२)
३)शीड सुकाणू नसलेले मी गलबत बाई (अर्घ्य पृ. ५)
४)कळेना कुणाची नजर शोधते मी (अर्घ्य पृ. )
५)सांगणारे सांग मजला तू कुणाचा? (जखमा अशा सुगंधी पृ.५५)
६)अंतरंगी मी फुलाया लागले (जखमा अशा सुगंधी पृ.१८)
७)उशीर झाला तुला यायला अखेर तू आलास तरी (जखमा अशा सुगंधी पृ.४१)
८)एकटी एकांत समयी मी हसाया लागले (जखमा अशा सुगंधी पृ.४५)
९) आले आले सख्या रे तुझ्या समीप आले (ओऍसिस पृ. ७२)
१०)अगतिक होते अपंग होते मी लाचार सख्या (ओऍसिस पृ.३२)
११)कळू नये कधी कुणा ऋणानुबंध आपले (ओऍसिस पृ. १८)
१२)पापण पदरामधे सख्या मी तुला लपविले आहे (ओऍसिस पृ.२)
आदर्श किंवा देवगुणी व्यक्तींच्या मनात स्त्री पुरुषांच्या गुणांचा समान वास असतो. इलाहींच्या स्त्रीमुखी गझलांतून स्त्रीचं सोशिक संयमित अस्वस्थ, तडफडणारं समर्पित प्रणयातुर आणि कधी कधी विलक्षण तटस्थ तृप्त मनही उलगडत गेलेलं आहे.
अशा रीतीने इलाहींच्या स्त्रीमुखी काव्यातून स्त्रीवाद व्यक्त झालेला असेल किंवा नसेल पण त्यातून स्त्रीच्या संवेदना जाणिवा आणि अनुभूती अनुभवण्यास मिळते.
(इलाही जमादार यांच्या गझलसंग्रहांची आस्वादात्मक समीक्षा पृष्ठ. क्र .२८/२९/३० वरून साभार).