णमोकार मज मंत्र मिळाला…
उजळत जाई मम आत्म्याला …
अक्षर अक्षर मंत्रामधले ..
ठिणगी पाडत जाते फुलण्या …
जाणिवेतले उच्चारण मम
भरवत जाई नेणिवेला ..
आत्मज्ञान अन चारित्र्याला
बहरून जाण्या लगडून जाण्या
फुलाफळांनी …
सुगंधित मन पुलकित करण्या…
विकसित होण्या आत्मा माझा
गुरु अरिहंता प्रथम नमोस्तु
द्वितीय मंदिरी सिद्धप्रभूंना
तिजा नमोस्तु आचार्यांना
उपाध्याय मुनिवरांस चौथा …
पंचम विश्वातील सर्व साधुंना …
प्राकृतातील णमोकार हा
सदैव जपण्या माळ जपाची ..
चांदी अथवा स्फटिक मण्यांची
मणी एकशे आठ आणखी
तीन मण्यांची …
स्मरत क्षमा मेरुमुनींची
एक एक मणी जो
जपत जाय तो
पार करे संसार सागरा …