शिशिरामधली अवखळ थंडी अंगांगाला झोंबत आहे
शेकोटीच्या ज्वाळेमध्ये तन मन यौवन नाचत आहे
गच्च दाटल्या धुक्यात पक्षी मौन पांघरुन बसला आहे
कंठामध्ये अवघडलेल्या गाण्यावरती रुसला आहे
पानांवरल्या दवबिंदुंतिल किरण शिरशिरी प्राशत आहे
जर्द नव्हाळी गव्हाळ काया उन्हास हळदी माखत आहे
सुरभित पुष्पे देहावरती भिजली माती झेलत आहे
सरत्या वर्षामधले काही सुंदर क्षण मी वेचत आहे
हवेहवेसे जे जे वाटे ते ते सारे जपते आहे
हृदयामधल्या मुग्ध प्रीतिला मनापासुनी भजते आहे