दवबिंदूंनी घट भरला अन
थरथरली बासरी…आली मंगल घटिका खरी …
हृदयमंदिरी जिन तीर्थंकर
आम्र वनी पक्ष्यांचे सुस्वर… भारद्वाज नि कोकिळ गाती
झुळूक फिरे नाचरी… आली मंगल घटिका खरी…
लता माधवी मुग्ध वल्लरी
उभ्या घेउनी पुष्प-आरती…निसर्ग ओते या पृथ्वीवर
सौख्याच्या घागरी… आली मंगल घटिका खरी …
पुनव चांदणे ऋद्धी सिद्धी
भिजे चांदणी कुलीन बुद्धी… वीज चमकते लखलख लखलख
…झरण्या अक्षर सरी…आली मंगल घटिका खरी …
सखेसोबती भूचर वनचर
तृप्त जाहले खेचर जलचर…स्वर्गामधुनी देव-देवता
बघताती भूवरी … आली मंगल घटिका खरी …
अक्षतरूपी सुंदर वचने
रंगीत सुरभित कोमल सुमने…हासत नाचत रानामधुनी
उधळत ये वनपरी… आली मंगल घटिका खरी…
दवबिंदूंनी घट भरला अन
थरथरली बासरी..आली मंगल घटिका खरी …….