This Ghazal is written in thirty-two (32) ‘matraas’. Some critical problemsin our society are discussed in this ghazal.
आवर सावर खुळ्या वासना, नाच बास हा नंगा आता;
मुनी मनातिल हंसासंगे, व्यर्थ कशाला पंगा आता!
नको पोखरू मुदुल भावना, स्वतःच बनुनी भुंगा आता;
टाक पावले पुरे जाहला, पाळण्यातला दंगा आता!
घोडागाडी घुंगुरवाळे बाळ मनाचे बाळ चोचले;
किती पुरवशिल घालायला, अंगणात या पिंगा आता!
स्वच्छ वाहत्या हृदयाला या, बांध कुणीना घालू शकते;
कधीच ना आटेल झरा मुक्त जाहली गंगा आता
रंगबिरंगी करी बावटे, घेउन फिरती सरडे सारे;
कुंपण त्यांचे त्यांना ठाउक, ओळख त्यांच्या रंगा आता!
वजने मापे लाव स्वतःला, नकोस तोलू तू दुसऱ्याला;
नीतळ कागद लपेटना रे, डोळ्यावरल्या भिंगा आता!
चिनी जपानी च्याऊ म्याऊ, सारे आम्ही बहीण भाऊ;
तीन रत्नयुत त्रिशुलासाठी, त्यागिल वैर फिरंगा आता!
मुळा-मुठेची पवना माई, सह्य गिरीवर गाणे गाई;
हिमालयाच्या शिखरावरती, लहरे उंच तिरंगा आता!
जरी तयांचे शब्द विखारी, धार दुधारी कापत जाई;
फुलांपरी कोमल शब्दांचा, दाव ‘सुनेत्रा’ इंगा आता!