टळटळणाऱ्या मस्त दुपारी
ऊन सांडते भरून झारी
तशात अवचित सुटते वादळ
नयनी ख च्या भरते काजळ
पाचोळा उडणारा भिरभिर
घरात पंखा फिरतो गरगर
नभी कृष्ण जलदांच्या माला
म्हणती पाऊस आला आला
मेघ गर्जना गडगड गडगड
पक्ष्यांची झाडावर बडबड
वीज नाचते कडकड कडकड
वळवाची सर तडतड तडतड
छपरावर उडणाऱ्या गारा
अंगणात ओघळती धारा
वळचणीस चिमणीची चिवचिव
तृणपाती थरथरती लवलव
ग्रीष्मामधला उन्ही उन्हाळा
तापट आहे जरी बावळा
वळवाची सर घेऊन येतो
म्हणून मजला तो आवडतो