This Ghazal is written in maatraa-vrutt(32 maatraas). Here radif and kafiya are dissolved in each other.
कधी कधी मी असते सीता कधी कधी मी पांचालीही
कधी कधी तर हेलन केलर कधी कधी मी गांधारीही
सौदा करुनी मम स्वप्नांचा प्रेम शोधिण्या फेसबुकावर
ओंजळ बनते कांच-कटोरी कधी कधी मी व्यापारीही
मी सोनेरी वीज पुणेरी तोलुन मापुन झटका देते
वीर मर्दिनी कोल्हापुरची कधी कधी मी सातारीही
उडवित धुरळा माळावरती कधी खडखडे माझा छकडा
नंदीवरुनी परी मिरविण्या कधी कधी मी अम्बारीही
अक्षरस्वप्ने सत्य कराया नभी उडतसे पतंग जेव्हा
भूमीवरुनी धागा पुरवी कधी कधी मी आसारीही
थेंब टपोरे जलदांमधले रविकिरणांसम अचुक छेदुनी
इंद्रधनूला रंग देतसे कधी कधी मी रंगारीही
कधी बालिका कधी किशोरी कधी सुनेत्रा सुंदर नारी
मम बाळांना चोप द्यावया कधी कधी मी म्हातारीही
ऐकुन घंटारव तो मंजुळ नयन उघडिते अर्धे मिटले
धूप सुगंधी दरवळ लुटण्या कधी कधी मी गाभारीही
प्रेमवीर अन वीर प्रेमिका जीव मुमुक्षू पाण्यामधले
नौकेमध्ये माझ्या बसता कधी कधी मी नावाडीही