कविता – KAVITAA


कविता असुदे वाकडी
अथवा सरळ
किंवा वेलांटीदार
वळणा वळणाची !
तिचं वाकडेपणसुद्धा कधी कधी जपावं !
तिचं सरळपण साधावं
तिची मोहक वेलांटीदार वळणे
आपणही घ्यावीत…
वेलांटीत वाकावं, उकारात उडावं !
काना मात्र्यात टिपावं
चिंब भिजलेलं मन !
मग नकळत हसावं विसर्गात
अधर  किंचित वक्र करून !
कविता असतेच एक हलकी मोळी
गझल वृत्तात बांधल्यास होते पुरणपोळी !
कधी फिरते गोल गोल
कधी परीघावर दुमडलेली तर
तर कधी केंद्रात फाटलेली…
भरून येण्यास सदैव तयार
कधी मोहक डौलदार
जगण्यातली बहार!
कधी असते मुक्तछंद
झऱ्यासारखी धुंद फुंद !
खडकांना धुते
वेलींना भिजविते
प्रभातीच्या सूर्य किरणांना प्राशून
सोनसळी बनते!
दुपारी चंदेरी चमचम होते
सांजेला केशर मोतिया बनते !
कविता अशीच असते !
उधळ माधळ करते ….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.