केंद्र कोणते परीघ पुसतो नवल वाटते त्रिज्येला
ठोकुन खुंटी केंद्रावर ती मार्ग आखते संध्येला
संधीकाली डोंगरमाथी रंग केशरी उधळाया
सविता उतरे जळात अलगद सोनेरी तनु बुडवाया
तरंग उठती निळ्या जळावर वर्तुळ विस्तारत जाते
व्यासही मोठा मोठा बनतो काठाशी जोडे नाते
स्पर्शायाला मृदा काठची लहरींसंगे धावाया
वारा येतो शीळ घालतो जलबिंदूंना चुंबाया
जलदेवी रात्रीला येते मुग्ध काळिमा प्राशाया
चंद्र तारकांना बोलावी कृष्ण यामिनी नाचाया
मात्रावृत्त (१६+१४=३० मात्रा)