घडा गडगडे गोल गड्या
हलते पाणी तोल गड्या
अर्थ जाणण्या मौनांचा
बुडी मार तू खोल गड्या
भाव नेत्रिचे हरिणीसम
अर्थ काढणे फोल गड्या
अमोल माझी गझल गुणी
तिचे खरे कर मोल गड्या
अनुभूतीचे मिळव गरे
साल फळांची सोल गड्या
अचूक टिपणे ही माझी
पकडण्यास तव झोल गड्या
गरगर भिरभिर नजर फिरे
मम डोळ्यांवर डोल गड्या
मी चवळीची शेंग जणू
भुईमूग तू ढोल गड्या
पार करुदे घाट विटी
जोर लावुनी कोल गड्या
थांबा कळण्या उभारुया
खांब स्तंभ वा पोल गड्या
नाक्यावरच्या टोळांना
टाळ द्यायचे टोल गड्या
मात्रावृत्त(८+६=१४ मात्रा)