लंबक हलतो काटे फिरती करते टिकटिक घड्याळ माझे
सुसम तबकडी आकडे बारा चाले झुकझुक घड्याळ माझे
जोवर घेते श्वास तोवरी अखंड फिरती हात तीनही
सेल संपता श्वास अडकतो करते चुकचुक घड्याळ माझे
धूळ झटकण्या अंतरातली भिंतीवरुनी उतरे खाली
वळवुन काटे सेल घालता गाते धकधक घड्याळ माझे
जुनी ब्याटरी बुरसटल्यावर कधी कधी चाले किल्लीवर
मूढ अडमुठ्या ब्याटरीस त्या चिडवित टुकटुक घड्याळ माझे
कृष्ण यामिनी प्रकटे जेंव्हा रेडीयमचे जडाव लेउन
चांदण भरल्या आकाशासम चमके लुकलुक घड्याळ माझे
मी तर त्याची खूप लाडकी म्हणून माझे सर्व ऐकते
नकोनकोशी वेळ मला जी खाते बकबक घड्याळ माझे
मात्रावृत्त(८+८+८+८=३२ मात्रा)