चल चल भिंगू म्हणत म्हणत हा फिरे गरारा वारा
नका नका रे नावगाव पुसु असो मतलई खारा
ताप तापते ऊन उकळते वरवर चढतो पारा
हलके हलके सरसर येती भरभर तडतड गारा
अंगांगावर रोम शहारा घळघळ सरसरणारा
थेंबामध्ये चिंब बिंब तन झेल झेलते धारा
भुरे पाखरू किलबिल करुनी तोडे फोडे कारा
हूड वासरू चरते खाते हिरवा हिरवा चारा
आभाळाच्या भाळी उलटे इंद्रधनू जणु हारा
खुल्या गवाक्षी निळसर पक्षी लुकलुकणारा तारा