चिद्घनचपला – CHIDDGHAN CHAPALAA


जाति : झपूर्झा

हावभाव रे आवडले
हास्य तापले
सुंभ जळाले
कातळकाया पाझरली
पीळ सुटोनी कळ तुटली
कातळातुनी वर आली
भरून प्याला
सांडू लागला
काय जाहले सांग बरे
निर्जरा ! कर्मनिर्जरा !

बाह्यरुपाला जे भुलले
ते पाघळले
ते काजळले
शिकविण्यास त्या अंधांना
घालित बसले कोड्याला
खिळे ठोकुनी झाडाला
ते झाड अडे
कोड्यात पडे
आग लाविता खाक पुरे
निर्जरा ! कर्मनिर्जरा

रत्नांच्या मालिकेवरून
वेगात तरून
अंधार चिरून
चिद्घनचपला सळसळते
हूम हूम ना ती म्हणते
पाहुन अज्ञाना हसते
पण ना माते
पण न उते
तप्त लेखणी मंत्र धरे
निर्जरा ! कर्मनिर्जरा !

प्रकृतिचे अन संस्कृतिचे
भरण्या पोटे
साटेलोटे
कितीक नावे मार्गांची
मार्गावरच्या धोंड्यांची
त्या धोंड्यांच्या अधरीची
शिकेन भाषा
ही अभिलाषा
स्वर्ग उतरण्या मनोमंदिरी
निर्जरा ! कर्मनिर्जरा !

जीवअजिवांच्या सृष्टीत
मनुज जन्मतो
रंग गंधतो
तरी विषमता जगतातील
पाहुन विकृती कर्मातील
झरते करुणा हृदयातील
आस्त्रव घडण्या
बंधन तुटण्या
संवर घडूनी मोक्ष मिळाया
निर्जरा ! कर्मनिर्जरा !


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.