In this poem the poetess says, real heaven is on the Earth. Our emotions are god’s gift. So you should take good care of your emotions.
मम मुग्ध भावनांच्या मेघात मी बसोनी
का दूर दूर गेले क्षितिजास पार करुनी
इमले तिथे किती गं त्या केशरी ढगांचे
वेलीस पर्ण पाचू अन गुच्छ माणकांचे
अंगणी मस्त झुलवा नक्षत्र वल्लरींचा
शिम्पिते सडा रमणी मोति नी पोवळ्यांचा
होता समुद्र तेथे लाटात रत्न राशी
गुलझार पऱ्या तेथे सौंदर्य गीत गाती
झाडांवरी हिऱ्यांच्या मंदिर बांधलेले
तो कळस सोनियाचा ध्वज लाल जाहलेले
गंधर्व गाती पूजा संगीत किन्नरांचे
तरीना फुलून आले मम मेघ भावनांचे
मूर्तीस शोधूनिया मम नेत्र किती थकले
पाहून थाट माट गालात मेघ हसले
परतून मेघ येता क्षितिजावरी पुन्हा ते
करिते तया सावळे ते शीत गार वारे
घनघोर झरती धारा जलदातुनी मण्यांच्या
हृदयातुनी बरसला हा मेघ पावसाचा
अवनीस ना उसंत धावे सलिल बाळ
रंगांची उठली वलये काव्यातुनी सलील
निद्रिस्त केवड्याला तो वात साद घाली
या बकुळ फुलांची माय मातीत ठाकलेली
नाजूक मौन तनु ही देते भरून दान
प्राशी सुवास माती हरपून देह भान
किती धुंद धून छेडे मम डौलदार काया
गाण्यात मावतेना माझी अपार माया