दुःख (गझल) – अनुवादित गझल
इलाही जमादार यांच्या मूळ उर्दू गझलेचा (तनहाई-ग़ज़ल- शायर- इलाही जमादार गुफ़्तगू-प्रथम संस्करण १५ जून २००७) मुक्त भावानुवाद.
आम्र तरुतलि, ऊन सावलीत, मौन एकटे, बसलेले..
किलबिलणाऱ्या, किरणांखेरिज, शांततेत जग, रमलेले…
जिथे पहावे, तिकडे लाटा, गाज सागरी, भरतीची..
असले कसले, वेडे जल ते, नाव, किनारा, नसलेले…
तृप्त धरेवर, अम्बरातली, मुग्ध लाजरी, प्रतिबिंबे..
दव अश्रूंचे, तुझ्या स्मृतींनी, पापण-काठी, जमलेले…
तप्त वाळुच्या, स्वर्गामधुनी, कुणी प्रेमिका, गात फिरे..
क्षणाक्षणांची, फुले निरागस, श्वास सुगंधित, फुललेले…
छायेमध्ये, सूर्याच्याका, एक सावली, थकलेली..
निरखुन बघता, कळले मजला, दुःखच ते मम, हरलेले…