In this poem The small stream of water in the mountain is personified as a Young(teen-ager) girl. How this stream acts like a teen-ager girl is described in this poem.
खडकामधुनी निर्झरबाला
धावे खळखळ नाद आगळा
पैंजण पायी वाजे छुमछुम
श्रावण सरीची वाटे रिमझिम
मुग्ध शैशवा धवल मौक्तिका
उधळित जाते चंचल बाला
तृणबालेशी वळून बोले
वाऱ्याशी ती झिम्मा खेळे
हिरवे कंकण तृणबालेचे
हिजला पण ती बेडी वाटे
केतकीचा तो गंधधुमारा
वाटे हिजला मोहपिसारा
नको म्हणे ती रंग-गंधणे
नको थांबणे नको गुंतणे
धावत धावत पुढेच जाणे
हे धारेचे अक्षय गाणे
धुंदफुंद हे गाणे गाता
मस्तित वाहे रूपगर्विता
थांब जरा मग कोण म्हणाले
कृष्णमेघ तो निळासावळा
का मी थांबू निळ्या घना रे
माझ्यासंगे तू येना रे
कभिन्न काळ्या कड्यावरुन मी
झोकून देइन मम देहाला
कभिन्न काळा कडाहि क्षणभर
श्वास रोखुनी कापे थरथर
त्या प्रीतीच्या आवेगाने
देह लोटला गिरिबालेने
कोठे गेली तिची धवलता
मृण्मय मिसळे जळात आता
अंतरी कोणी साद घातली
ऋतुमती तू आता झाली
जलद सावळे दाटून आले
गिरीबालेला न्हाऊ घातले
उरली न आता गडबड घाई
नुपूर न वाजे आता पायी
नाद अनामिक गूढ अंतरी
कृष्ण सखा वाजवी बासरी
निळ्या नभाची मस्त निळाई
अंगांगावर पसरत जाई
आभाळीचा मेघ उतरला
कानी कुजबुज करून गेला
काय म्हणू मी तुजला बाई
गंगा गोदा की कृष्णाई
म्हणोत कोणी चंचल मजला
मी तर आहे सुजला सुफला
हासत बोले ती गिरिबाला
जाईन पुढती मी घननिळा
शांत संथ ती वाहे राणी
चैतन्याची रचते गाणी
जीवन फुलवित मिळे सागरा
जलास मिळते ती जलधारा
थांबव आता मनीचा झुलवा
घेना आता जरा विसावा
खट्याळ बोले मेघ सावळा
करितो अजुनी सोबत तिजला
का मी थांबू निळ्या घना रे
साद घालिती मज लाटा रे
लाटेसंगे उसळी घेईन
किरणांसंगे वरती जाईन
बसून मग मी तुझ्या विमानी
चैतन्याची गाईन गाणी
कोसळेन मी गाता गाता
गिरी शिखरांच्या कुशीत जाता
निर्झरबाला पुनश्च होईन
तव प्रीतीचे गाणे गाईन
सांगीन मी या चराचराला
अंत नसेरे या प्रेमाला