जाति : श्यामाराणी
झुळुक पहाटे लहरत आली
प्राजक्ताच्या झाडाखाली
शुभ्र फुलांची पखरण झाली
धवल केशरी रांगोळीने भुई चिंबली रंगात
पानांवरुनी ओघळल्यावर
थेंब दवाचे टपटपल्यावर
लोळुन घुसळुन त्यात स्वतःला भिजली माती गंधात
मातीवरचे टिपण्या दाणे
रंगबिरंगी पक्षी आले
टिपता दाणे गाती गाणे
जणू आकडे बसलेले ते अंकलिपीतिल अंकात
एक पाखरू निळे त्यातले
भुंग्यामागे उडू लागले
दमून चाफ्यावरती बसले फांदीवरच्या झोक्यात
पहाटवारा निळे पाखरू
भृंग लागले मना पोखरू
शब्द शब्द लागले पाझरू
म्हणू लागले कवयित्रीला पकड आम्हा तू वेगात
केशवसुत तव श्यामाराणी
जाति सुंदरा मला भावली
म्हणून रचले मी हे गाणे लयीस पकडुन ठेक्यात