भाद्रपदातिल शुक्ल पंचमीस पर्व पर्युषण येते
खास तिथिस या नेमाने मग प्रियची आठवण येते
प्रिय म्हणजे जो हृदयी वसतो व्यर्थ न भटकत बसतो
धर्म अहिंसा स्थापित करण्या मनामधे अवतरतो
देवघराचा मोह न प्रियला प्रियवर मोहित सैनी
पुण्यभूवरी प्रियसाठी नव मंदिर बांधे जैनी
क्षमा मार्दवे जीव शोभतो आर्जव सुवर्ण कंकण
देह शुद्ध अन हृदयी शुचिता हे भक्ताचे भूषण
प्रिय सत्य अन संयम यांचे जन्मजन्मिचे नाते
तनामनाला तप तापविते त्यागाचे गुण गाते
परिग्रहाला बांध घालण्या अकिंचन्य व्रत असते
सुंदर आत्म्यामध्ये रमता ब्रम्हचर्य झळझळते
सायंकाळी क्षमावणीला जिनानुयायी जमती
क्षमा मागुनी क्षमा करोनी भजन आरती म्हणती