मीही घडले
तीही घडली
तोही घडला
हाही घडला …
आपण घडलो
घडले सारे
कधी पडताना घडले मीरे
दिवसा मोजीत होते तारे !
भिजवून गेले सुगंध वारे
अशीही घडले तशीही घडले
घडता घडता कधी बिघडले !
हमसून हमसून मीही रडले…
पिंजऱ्यातले बंद हुंदके
फुटल्यावरती मौक्तिक बनले
नक्षत्रांची नव्हती माला
नव्हता मृग अन चित्रा स्वाती !
तरीही बघ टपटपले मोती
त्या मोत्यांची गुंफून फांती
हसले गडगड विझवून वाती !
वीज चपळ मी तेजस ठिणगी
त्या ठिणगीने भरली कणगी
यज्ञ पेटला उधळत ज्वाला
त्यातून हसल्या बिजली बाला !