किती दिसांनी फूल उमलते कलमी रोपावरी
मृदुल पाकळ्या तेजस वर्णी चण ही नाजुक जरी
कैक कुमारी कोरफडी या भवती तुझिया फुला
बाजुस भक्कम आम्रतरू हा डुलतो भक्तापरी
भूमीमध्ये गाडुन घेउन अंतर ध्यानामधे
रमले आहे उत्सुक उत्सुक गोंडस माइणमरी
चिमणपाखरे अंकुर दाणे टिपण्या यावी इथे
भिजवाया तनु पंख तयांचे पडोत श्रावणसरी
नाव ‘सुनेत्रा’ सार्थ जाहले तुमच्या पुण्यामुळे
भाग्यवान मी आई दादा तुमची कन्या खरी
मात्रावृत्त – ८+८+४+७= २७ मात्रा