भिजल्या पानावरी लिहावी गझल तुझ्यासाठी
घडवावे मी मरूनसुद्धा नवल तुझ्यासाठी
घडवायाचे मला न काही दाखविण्यासाठी
खिरुनी विरुनी होतिल स्वप्ने तरल तुझ्यासाठी
शिशिरामध्ये पाने गळती धरा शुष्क होते
मी ग्रीष्मातिल वळवाची सर सजल तुझ्यासाठी
प्रभात समयी पानांवरती टपोर दवबिंदू
बनेन मी त्या दवबिंदूसम धवल तुझ्यासाठी
कधी वात मी कधी ज्योत मी कधी कधी समई
कधी नीर मी कधी तयातिल कमल तुझ्यासाठी
मात्रावृत्त (१६+१०=२६ मात्रा)