मम भावना फुलांची उबदार शाल आहे
कविता नि गीत यांची अलवार चाल आहे
मज शेर हा सुचावा पण तूच तो टिपावा
गझलेत तोच राजा दिवटी मशाल आहे
जगण्यास मस्त गाणे लिहितात काव्य वेडे
कसला लिलाव आता झुलतो महाल आहे
मज भावली निळाई मग रंगली रुबाई
सल मुक्तकात माझ्या कटुता जहाल आहे
लय सूर चारुतेचा घन घुंगरात वाजे
मृदु लावणीस खासा दमदार ताल आहे
वृत्त – गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.