जिंकेन सर्व हृदये माघार शक्य नाही
शिखरावरी उभी मी पडणार शक्य नाही
मिळवेन सर्व सौख्ये खेचून सर्व तारा
सध्यातरी इथूनी हलणार शक्य नाही
परिघावरी कसेही फिरती अनेक शत्रू
केंद्रातुनी कधीही ढळणार शक्य नाही
मजबूत पकड माझी आसावरी अशीकी
उडतो पतंग वेगे कटणार शक्य नाही
दृष्टीस धार इतुकी कापेल दुष्ट नजरा
अश्रू अमोल माझे झरणार शक्य नाही
जे जे मला हवे ते बरसेल मुक्त धो धो
कुठल्याच प्राक्तनाने अडणार शक्य नाही
शुद्धात्म अंतरीचा आवाज तू ‘सुनेत्रा’
आता कुणापुढेही दबणार शक्य नाही
वृत्त – गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.