आले नव्या क्षणांचे दमदार वीसचौदा
ठोकेल पार क्षितिजी षटकार वीसचौदा
गेले खिरून झरुनी बिंबात वीसतेरा
गाठून मंगळाला येणार वीसचौदा
हृदयास शुभ्रवर्णी छेडून तार जाता
रंगात लक्ष सुंदर भिजणार वीसचौदा
नाचे मयूर रानी फुलवून मोरपीसे
त्यातील पीस आहे अलवार वीसचौदा
काटे किती जुने ते असुदेत टोचणारे
काढून त्यांस जखमा भरणार वीसचौदा
फुलपाखरी मनाची स्वप्ने खरी कराया
गुलजार पाकळ्या फुलणार वीसचौदा
राहून स्वर्गलोकी अन भूवरी ‘सुनेत्रा’
करणार ब्रम्हलोकी संचार वीसचौदा
वृत्त – गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.