This Ghazal is written in maatraavrutta. Radeef is Aataa and Kaafiyaas are pakadoo, ughadoo, badadoo etc.
तूच सांग मज, नवे निराळे, वृत्त कोणते, पकडू आता
हृदयाच्याही, आत आतले, कवाड कुठले, उघडू आता
गट शब्दांचे, ठाकुन ठोकुन, बोटांवरती, मात्रा मोजुन
लयीत बसण्या, कोंबुन डांबुन, किती तयांना, बदडू आता
लघु गुरूंचा, ओळखुनी क्रम, स्वराघात तो, अचूक जाणुन
यतिभंगाला, गोंजाराया, गूढ अर्थही, रगडू आता
गाल गुलाबी, नार नवाबी, लगावली तिज, कैसी लगवू
नाना गागा, मंतर जपण्या, मिळून सारे, झगडू आता
हवे तसे मी, गाइन सुंदर, वेळु बनातिल, वारा होउन
तुझे ‘सुनेत्रा’ स्वतंत्र गाणे, अक्षरात का झगडू आता
वृत्त – मात्रावृत्त , मात्रा ३२ = ८ +८+८ +८