बावऱ्या गझलेस माझ्या स्थैर्य आता लाभले
शेर सारे प्रकटलेले अंतरातुन उजळले
कलम हाती घेउनी मी फोडता या हिमनगा
शुभ्र मौक्तिक चूर्ण माझ्या भोवताली सांडले
ना सिकंदर व्हायचे मज ना गुरूही व्हायचे
जिंकण्या हृदये फुलांची मी बहर हे माळले
गोठल्या झाडात पुन्हा आवाज काही गुंजता
मृदुल हिरव्या पालवीने अंग त्याचे रंगले
शब्द मोहक अर्थ सुंदर वृत्त चंचल धावते
अन मनोरम भाव चुंबुन कैक वेडे जाहले
उधळता प्राजक्त भवती मोति आणी पोवळे
ओंजळी भरुनी सुखाने शिशिर वारे चालले
ही भटांची शान असुदे वा हृदय गालीबचे
पाहता नेत्रात तिचिया मी ‘सुनेत्रा’ डवरले
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.