सम्यग्दर्शन नाजुक अंकुर जादू त्याची खरी खरी
हृदयामधली शमवी गुरगुर जादू त्याची खरी खरी
दिवा अंतरी उजळे सुंदर ज्ञान आपुले झळाळण्या
चारित्र्याचा तेवे कापुर जादू त्याची खरी खरी
गुरे वासरे कुरणामध्ये अभय होउनी चरताना
मंजुळ वाजे गळ्यात घुंगुर जादू त्याची खरी खरी
नाद अनाहत गाभाऱ्यातिल जेंव्हा जेंव्हा घुमे खिरे
शिल्पी घडवी मंदिर गोपुर जादू त्याची खरी खरी
संपविण्याला गंडे दोरे कुंडलीतले ग्रह तारे
लिही ‘सुनेत्रा’ ऐसा मजकुर जादू त्याची खरी खरी
मात्रा वृत्त – (८+८+८+६ =३० मात्रा)