भिजेल चिंब चांदण्यात सरेल रात गात गात
नवीन सूर्य उगवताच सरेल रात गात गात
जुने नवे स्मरून प्रेम बुडेल हृदय पूर्ण त्यात
खिरेल नीर लोचनात सरेल रात गात गात
हसेल पूर्व अंबरात झरेल नाद मंदिरात
झुलेल वात पाळण्यात सरेल रात गात गात
खगास जाग येत येत घुमेल शीळ वाटिकेत
सुगंध भोर सावल्यात सरेल रात गात गात
सुजाण मैफलीत मुग्ध भरून मंद श्वास घेत
दमून बाळ झोपताच सरेल रात गात गात
सजीव मूर्त राउळात सतेज पर्ण कोंदणात
मवाळ पुष्प पावसात सरेल रात गात गात
निनाद सूर ताल वाद्य सुघोष घोष संगतीत
अवीट भारल्या स्वरात सरेल रात गात गात
जलात सावळ्या झुकेल फुलून तृप्त आम्रवृक्ष
सचैल घेत किरण स्नान सरेल रात गात गात
सुरेल पूर्ण सत्य गोष्ट खरी ठसेल मन्मनात
निशांत धवल पाहताच सरेल रात गात गात
वृत्त – ल गा ल, गा ल गाल गाल, ल गा ल, गा ल गाल गाल.