सहज सहज तू लिहित रहावे
तेच खरे मम मानस व्हावे
तुझे न माझे असे नसावे
ओंजळ भरुनी द्यावे घ्यावे
नीतळ रेखिव मुक्तछंद तव
जणु पानांवर ओघळते दव
ओघळताना टिपते मी रवं
मुक्तछंद वा गझलवृत्त ते
पकडून त्याला शब्द खरडते
शब्दांसंगे मी झुळझुळते
कशास ओळी मोजुन लिहू मी
भाव निरागस का लपवू मी
शब्द जरी घाईत लिहिते
वेलांट्यांची वळणे जपते
उकार माझे वर वळणारे
जणू नभीचे खग उडणारे
काना मात्रे जरी फराटे
अनुस्वार जणु टोक सराटे
चांदण भरले अंबर वाटे
विरामचिन्हे वेगवेगळी
टिंबटिंबची जल रांगोळी
लिहिता लिहिता कधी थबकते
डोळे भरुनी सारे बघते
शब्दांवरती ओढत रेषा
न्यहाळते मम काव्य नकाशा
अथ… पासुनी इति येईतो
साठवते मनी मौनी भाषा
पुन्हा एकदा वाचत जाते
अक्षर बनुनी वाहत जाते
अधल्या मधल्या जागांमध्ये
नकळत काही शब्द पेरते
त्यातुनसुद्धा बाग बहरते
तुला भावते मला भावते
लिहिता लिहिता मी गुणगुणते