सूत पकडुनी स्वर्ग गाठणे अवघड असते
बिनछिद्राची सुई ओवणे अवघड असते
जरी ओवला सुईत धागा अंधारातच
अंधाराला शिवण घालणे अवघड असते
प्रथमदर्शनी प्रेमामध्ये पडल्यावरती
उठता बसता प्रेम पटवणे अवघड असते
कोणालाही ना जोखावे मुखड्यावरुनी
मुखडा पाहुन अंतर कळणे अवघड असते
असे पटवले तसे पटवले गप्पा सोप्या
हृदयामध्ये प्रीत टिकविणे अवघड असते
पटवायाची बोलायाची बातच सोडू
नजरेला पण नजर भिडवणे अवघड असते
जरी पुस्तके लाख वाचली गझलांची तू
समोर येता तिला वाचणे अवघड असते
शब्द खेळवे गझल जरी शब्दांनी बनते
शब्दांमध्ये तिला पकडणे अवघड असते
अवघड केल्यावरती हाती सोपे येते
त्या सोप्याला अवघड करणे अवघड असते