फक्त फुलंच बनलो तर फुलायचं पूर्ण!
उमलून यायचं पाकळी पाकळीनं …
फूल रंगीत पाकळ्यांचं, फेनधवल पाकळीचं
किंवा सुंदर पाकळ्यांचं!
सुगंध उधळणारं मोहक फूल!
कोणतही फूल आनंदी फूल…
कधी देवाच्या पूजेत रमायचं
कधी बुकेत तर कधी गजऱ्यात
दाटीवाटीने बसून
खिदळायचं हसायचं !
कधी झाडावरच डुलत रहायचं
मजेत गाणी गात…
वाऱ्यानं कधी केसर शिम्पताच
जमिनीवर पडायचं
परत पावसात रुजून यायचं !
फळ झालो तरी
वाढायचं दिसामाशी
चारी अंगानी भरायचं
रसदार चवदार बनायचं
कोणाची तरी खरी भूक भागवायला!
नाहीतर मग झाडावरच पिकून खाली पडायला…
मग फळात परत असतंच की बी! किंवा बिया!!
गाडतं मग त्याला परत कोणीतरी मातीत!
पाणी देतं क्षार देतं! बघत राहतं वाट
अंकुर वर येण्याची!
मग पण बीची पण काही तहान तृष्णा असतेचकी !
मग बी येतेच बाहेर !
मूळ होऊन, उपमुळे केशमुळे बनून
मुळे पसरतात खोलवर
अवती भवती दूरदूर …
मग पुन्हा येतात अंकुर
अंकुरच अंकूर …
मग पुन्हा तेच ऋतुचक्र
तहान संपेपर्यंत फिरावच लागतं
चक्रात …
पण फिरल्यास आनंदाने चक्र नसते चक्र!
ते असतं खरं जगणं!
पण जर बी गाडलंच गेलं नाही तर
उगवत नाही वर अंकुर
आणि खाली मूळ !
आणि एखादं बी गाडूनही
नाही बनत त्याचं झाड !
कारण त्याला नकोच असतं
झाड बनायला
तोच असतो त्याचा मोक्ष
जीवनाचा सोक्ष मोक्ष …