हाक मी मारू कुणाला ज्ञात नव्हते
अंतरी उमलूनही मी गात नव्हते
माझियासाठीच रस्ता थांबलेला
स्वच्छ इतुका पण पुढे मी जात नव्हते
गरज होती एकमेका पाहण्याची
त्याचवेळी मी तुझ्या नयनात नव्हते
स्पंदने होती सुखाची गोठलेली
दुःखही तेव्हा उभे देहात नव्हते
हात मैत्रीचा धरावा एवढेही
धैर्य तेव्हा भाबड्या हृदयात नव्हते
कुरुप मी होते खरी की सुंदरी रे
जाणण्याचे त्राणही प्राणात नव्हते
आरसा दावीत होता मी कशी ते
मिरविणे पण आपुल्या रक्तात नव्हते
या पुढेही मी सदा झोकात राहिन
सांग ना केव्हा कधी तोऱ्यात नव्हते
शेवटी त्या ज्योतिषाची हार झाली
भाग्य माझे हातिच्या रेषात नव्हते
धर्म प्रेमाचा जुना तो सत्य होता
तत्त्व त्यातिल भावनेला खात नव्हते
पायताणे उंच टाचेची तुझी पण
का तरीही चालणे तालात नव्हते
सावळी मी जलदमाला वर्षणारी
वासनेचे ढग तरी नेत्रात नव्हते
घर नवे बांधू फुलांचे ये सुनेत्रा
वापरोनी शब्द जे ओठात नव्हते
अक्षरगणवृत्त, मात्रा- २१
लगावली – गालगागा/गालगागा/गालगागा/