कल्पनेने शोध घ्यावे आजही
मोहनेने मोहरावे आजही
कंचनी काया फुलांची मोहरे
ज्योतिने ते रंग प्यावे आजही
सोनियाच्या दागिन्यांना घालुनी
वल्लरीने बागडावे आजही
केतकीने माखुनी हळदी उन्हा
सौरभाने फ़ुलुन यावे आजही
रेखुनी नयनात काजळ रेषिका
अनुपमेने मुक्त गावे आजही
मंजिरी वृन्दावनी या विखुरल्या
मृण्मयीने बीज ल्यावे आजही
बासरी चित्रात घुमते का तरी
अलकनंदे तू झुरावे आजही
अंजलीने तू सुनेत्रा शब्द दे
काव्यधारेने झरावे आजही
अक्षरगण वृत्त – मात्रा १९
लगावली – गालगागा/गालगागा/गालगा/