This Ghazal is written in Matravrutta. Thirty-one(31) matras are used for constructing this Ghazal. This Ghazal is Gair-murraddaf Ghazal. Kafiyas are Mor, Por, Chor etc.
रजनीगंधा उमलत जाता नववर्षाचा नाचे मोर
सरत्या वर्षा निरोप देउन निजे जुईची नाजुक पोर
पुरे जाहल्या चोऱ्यामाऱ्या हा कंठा घे शेवटचाच
शपथेवरती प्रियेस सांगे भल्या पहाटे कोणी चोर
काटेरी जाळीवर हिरव्या करवंदांचे लोभस घोस
टपटपणारे जलद म्हणूकी नेत्र सई तव काळेभोर
वर्षे येती आणिक जाती तुम्ही वेगळे केले काय
ज्याला त्याला टोचुन पुसती बाभुळ आणिक खटयाळ बोर
लेकुरवाळी कण्हेर यंदा मिळवायाचे म्हणते दाम
ठरवित बसते वेळापत्रक फुलण्याचेही काटेकोर
तमातसुद्धा तुला पाहते लेखणीस मी देउन धार
ढगाआडुनी तेव्हा हसते चवतीच्या चंद्राची कोर