जेव्हा प्रिय मम डोईत घुसते
नशा तयाची चढते चढते
पुरती मी मग वेडी बनते
अप्रियांचे वेड काढते
अन प्रियांना वेड लावते…
डोईमधल्या अनंत खोल्या
गडद जांभळ्या पडदेवाल्या
खोल्यांमध्ये प्रिय मग शिरते
सामानाला विखरुन देते
बंद कपाटे उघडुन सारी
सामानाला विखरुन देते
विस्मृतीतल्या घड्या चाळते
दुःखालाही चिडवित बसते
चिडवुन चिडवुन रडव रडवते
रडताना मग खो खो हसते
ओझे फेकुन हृदयावरचे
धुंद मोकळे नाच नाचते…
काव्यामधुनी मन उलगडते
रूप देऊनी सगुण सुंदर
मम इच्छांना सजीव करते
प्रत्यक्षाहुन काव्य मनोहर
रंगपिसारा फुलवून अपुला
जगास माझे स्वरुप दावते …
नको नको ते उडवुन काही
हवे हवेसे सारे देते
म्हणून माझे काव्यरुपी प्रिय
मम हृदयीचे बिंब वाटते …….